अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा.

20
अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा.
मूल (प्रति)
तालुक्यात  अनेक वर्षांपासून जबरानजोतधारक शेतकरी शेती करीत आहेत. त्यांना जमिनीचे पट्टे द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता जबरानजोत शेतकऱ्यांनी तहसीलवर मोर्चा काढला होता. यावेळ शेती आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशी घोषणा करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी धान व इतर पीक घेतात. अनेक नागरिक भूमिहीन असल्याने वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून मागील ४० वर्षांपासून उत्पन्न घेत आहेत. मात्र शासनाने अजूनही मालकी हक्काचे पट्टे दिले नाही. मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे यासाठी यापूर्वीही अनेक आंदोलने झाली.
अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी आश्वासने दिली होती. मात्र, अद्याप पूर्तता न झाल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अतिक्रमित शेतीचे तत्काळ पट्टे द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मोर्चात जानाळा, आगळी, फुलझरी, कांतापेठ, चिचाळा, हळदी व चिरोली येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.