उपयोगात येणारे ज्ञान म्हणजे सामर्थ्य: किशोर उरकुंडवार.
जनसेवा माध्यमिक विद्यालयात बालक पालक मेळावा.
मुल (प्रति)
बुद्धिमान होणे म्हणजे केवळ गुणवंत किंवा ज्ञानी होणे नव्हे. नुसतेच मिळवलेले ज्ञान हे भाररूप असते. जे ज्ञान उपयोगात येते ते खरे सामर्थ्य असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली कर्तव्याप्रती असणारी प्रज्ञा जागृत केली पाहिजे. आपल्या ज्ञानाचे उपयोजन नीट करता आले तरच जागतिक आव्हानांना सामोरे जाणारी नवी पिढी निर्माण होऊ शकेल. असे प्रतिपादन किशोर उरकुंडवार यांनी केले.
जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी येथे आयोजित ’बालक पालक मेळाव्यात ’ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन दिघोरीचे सरपंच वनिता वाकुडकर यांनी केले तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रदीपक रोहनकर हे होते. उरकुंडवार पुढे म्हणाले, पालकांनीही मुलांचा सन्मान केला पाहिजे. आपली मुले बिघडू नयेत यासाठी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी केलेली बचत ही खरी संपत्ती आहे. मुलांच्या कर्तृत्वाची पतंग उंच उडवितांना दोघांच्या नात्यांतील धागा तुटता कामा नये यासाठी पालकांनी सजग राहण्याची गरज आहे. यावेळी चंद्रशेखर रोहनकर, रविंद्र काटवले, मनोज बनकर, गणपती गोहणे, उद्धवजी मडावी प्राचार्य शुभांगी मुरकुटे तसेच मुख्याध्यापक मनोज अहिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेली आरती पुरुषोत्तम शेंडे, तसेच इयत्ता बारावीमध्ये प्रथम आलेला अनुराग चुदरी यांचा शिल्ड, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय मुन्नी ओमदास पाल (वादविवाद स्पर्धा), तुशी शिवकुमार पाल (प्रश्नमंजुषा स्पर्धा) ,तन्वी शरद पाल (वकृत्व स्पर्धा), तनवी हनुमान महामंडरे (गीतगायन स्पर्धा) या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचलन प्रा. धर्मेंद्र उंदीरवाडे यांनी केले. तर प्रा. अरुणा चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी व जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय नांदगावचे सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय अहिरकर, प्रा. राहुल नरहरशेट्टीवार, प्रा. रत्नमाला खडसंग तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.










