आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा.
मूल (प्रती)
अवकाळी पाऊस मदत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण (ई- केवायसी) करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधीची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील वर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतीचे, शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तालुका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येऊन संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण ई केवायसी करण्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी अवकाळ पाऊस मदत निधी प्राप्त करण्यासाठी आधार प्रमाणीकरण केले. परंतु अजून पर्यंत ही शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधीची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
शासनाने आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधी लवकर देण्याची प्रक्रिया करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.










