पुणे : बीडच्या मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला वाल्मिक कराड याने आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषातून आपल्यावर आरोप केले जात असून पोलीस तपासात मी दोषी आढळल्यास मला कोणतीही शिक्षा भोगायला मी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अटकपूर्व जामिनाचा माझा अधिकार असूनही, मी पुण्यातील पाषाण रोड येथील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण करत आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील दोषींना फाशी झालीच पाहिजे. मात्र राजकीय द्वेषामुळे त्यात माझे नाव जोडले जात आहे. “पोलिस तपासात मी दोषी आढळल्यास, न्याय देवाने दिलेल्या शिक्षेला मी तयार आहे.”










