कामठी ता प्र 25:परभणी शहरात परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतेची एका समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आली.या निषेधार्थ परभणी येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर परभणी पोलिसांनी आंबेडकरी जनतेला टार्गेट करून कोंबिंग ऑपरेशन सुरू केले व पोलीस स्थानकात डांबले दरम्यान वत्सलाबाई मानवते ही महिला मोर्च्यात सहभागी नसतानाही तिला पोलीस कास्टडी करून जीवघेणी मारहाण करण्यात आली तसेच या पोलिस कोठडीत असलेल्या ऍड सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला व निषेध मोर्च्यात सहभागी नसणाऱ्या 44 तरुणावर 15 प्रकारचे नॉन बेलेबल गुन्हे दाखल करीत न्यायालयीन कोठडीत नेले तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. उपरोक्त नमूद सर्व घटनेच्या निषेधार्थ आज 25 डिसेंबर ला कामठी येथे समता सैनिक दल कामठी तसेच संविधान प्रेमी व आंबेडकरी संघटनासह जागरूक नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या जनाक्रोश मोर्च्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला. या मोर्च्यात एक हजार च्या जवळपास नागरिकांचा सहभाग होता.
सर्वप्रथम शुक्रवारी बाजार चौक येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर परिसरात समता सैनिक दल कामठी च्या नेतृत्वात सर्व समाजबांधव एकत्रित येऊन परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना सामूहिक श्रद्धांजली वाहून मोर्च्यास सुरुवात करण्यात आली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, दुर्गा चौक, जयस्तंभ चौक, बाबू हरदास एल एन चौक होत कामठी तहसील कार्यालयावर धडकला.यानंतर शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत करून त्याच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी .भारतीय राज्य घटना प्रतिकृती ची विटंबना व परभणी दंगल प्रकरणातील मुख्य सुत्रधाराची माहिती मिळविण्यासाठी आरोपी सोपान पवार व ठाणेदार अशोक घोरबाण यांची त्वरित नार्को टेस्ट करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी .परभणी प्रकरणाची संपूर्ण चौकशी राज्य पोलिसांकडून काढून घेत त्वरित न्यायालयीन चौकशी करण्यात यावी ,परभणी प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या निरपराध तरुणांना दोषमुक्त करण्यात यावे.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद व्यक्तव्य केले अशा अमित शहावर कारवाई करण्यात यावी व त्यांचा गृहमंत्री पदावरून त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागण्याचे निवेदन राष्ट्रपती यांना प्रभारी तहसीलदार राजीव बमनोटे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. तसेच वरील मागण्या येत्या 30 दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन पुकारण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला. हा मोर्चा शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यासाठी कामठी शहरातील समता सैनिक दलातील सैनिक गण सह शहरातील संविधान प्रेमी सह आंबेडकरी संघटना व जागरूक नागरिकांनी सहभाग नोंदवीत मोलाची भूमिका साकारली.










