नागपूर : जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. खैरी कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला बायोडिझेल या धोकादायक ज्वलनशील पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
गस्तीदरम्यान, माऊंट लिट्रा झी स्कूल, खैरीजवळ खसरा क्रमांक 3 मध्ये 22000 लिटर बायोडिझेलचा अवैध साठा असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाला मिळाली होती. बायोडिझेल पेट्रोलियम पदार्थाच्या अवैध साठ्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी वेळीच ही कारवाई केली.
या छाप्यात पोलिसांनी एक टँकर, पाच प्लास्टिकच्या टाक्यांसह १९ लाख ८५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये राणी दुर्गावती चौकात राहणारे सिमरन सिंग, सतपाल सिंग आणि महेंद्र नगर टेका नाका येथील हितेंद्र सिंग, गजेंद्रसिंग राठोड यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी त्यांना जुनी कामठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.










