आकापूर वळणावर अपघात: एक मृत, अनेक जखमी.

31
आकापूर वळणावर अपघात: एक मृत, अनेक जखमी.
मुल(प्रति)
मूल नदीजवळील आकापूर येथील धोकादायक वळणावर काल रात्री, 3 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता, आंध्र प्रदेशला मजुरांना घेऊन जाणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स बस  उलटली. या भीषण अपघातात बसखाली चिरडून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मूल पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता पोलिसांनी जखमींना त्यांच्या वाहनांमध्ये रुग्णालयात नेले. दरम्यान, आकापूरच्या स्थानिक रहिवाशांनीही  मदत केली. बसखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. नंतर, क्रेनच्या मदतीने बस सरळ करण्यात आली आणि आत अडकलेल्या गंभीर जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
मूल/ आकापूर या मार्गावरील धोकादायक वळणावरील समस्या लवकर सोडवली नाही तर मोठी दुर्घटना अटळ आहे अशी भिती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.संबंधित विभाग  या वळणावरील समस्येवर उपाय म्हणून कोणतीही ठोस पावले उचलत नाही. आता या वळणावर ट्रक उलटणे ही सामान्य बाब झाली आहे. तरीही बायपास, रुंदीकरण किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.
या वळणावर नेहमी जीवघेणे अपघात होत आहेत. प्रवासी, नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने या वळण मार्गावरील समस्या त्वरित निकाली काढावी अशी मागणी नागरिकांनी सरकारकडे केली आहे.