घंटागाडीचा “चालक “ते नगरसेवकपदाचा उमेदवार…

644

घंटागाडीचा “चालक “ते नगरसेवकपदाचा उमेदवार…

रुपेश धोटेची जिद्दीची कहाणी..

राजुरा(प्रती)

बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घराची सर्व जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या आईने तीन मुलांना वाढवताना आयुष्यभर कष्टाची पकड सोडली नाही. घरातील मोठा मुलगा शिक्षणाकडे वळून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच कुटुंबाचा आर्थिक पाया नाजूक होत गेला. अशा वेळी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला धाकटा रुपेश आईला हातभार लावण्यासाठी पुढे आला आणि तारुण्यातच नगरपालिकेत कंत्राटी सफाई कामगार म्हणून रुजू झाला.

सेवेत रुजू झाल्यानंतर त्याच्यावर ‘घंटागाडीचा चालक’ म्हणून जबाबदारी आली. पहाटे पाचच्या सुमारास शहरातील रस्ते जागे होण्यापूर्वीच रुपेश कामावर निघून जायचा. वार्डापासून गल्लीपर्यंत कचरा गोळा करताना तो प्रत्येक नागरिकाशी आपुलकीने बोलायचा. शहरातील प्रत्येक कोपरा, त्यातील समस्या आणि लोकांचे दैनंदिन आयुष्य त्याने जवळून पाहिले. या प्रवासात मागील दोन-तीन वर्षांत अचानक अनेक कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हताश कामगारांच्या डोळ्यातील वेदना त्याने अनुभवली. “आपल्या लोकांसाठी काहीच करू शकत नाही… ही भावना त्याच्या मनाला चिरली.” हा प्रसंग त्याच्या हृदयात कायमचा कोरला गेला.

याच क्षणापासून रुपेशच्या मनात राजकारणात उतरून कामगारांना न्याय देण्याची आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थेला स्थैर्य देण्याची इच्छा निर्माण झाली. निवडणुकीची घोषणा होताच तो उमेदवारीसाठी विविध पक्षांचे उंबरठे गाठत राहिला. मात्र ना मोठे राजकीय पाठबळ, ना पैसे… त्यामुळे सर्वत्र त्याला नकार मिळत राहिला. अखेर अपक्ष म्हणून लढायचा निर्धार करून तो अर्ज भरण्यासाठी निघाला.

पण नशीब इथेच वळण घेतं—अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी एक तास आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने त्याला उमेदवारी दिली. प्रभाग क्र. १ मधून अधिकृत उमेदवार म्हणून त्याने अर्ज दाखल करताच राजुरा शहरात चर्चेला उधाण आलं. सहकारीही त्याच्या पाठीशी उभे राहिले. काही सामाजिक संवेदना जोपासणाऱ्या व्यक्तींनी त्याला मदतीचा हात दिला आणि स्वप्नांना बळ दिलं.

सकाळी कचरा गोळा करणारा रुपेश आता त्याच घरांपुढे मतांचा आशीर्वाद मागण्यासाठी उभा आहे. नागरिकही त्याचं स्वागत करत आहेत. “दिवसाढवळ्या आपल्या भागातील समस्या हाताळणारा, आपल्यासोबत राहणारा माणूस आता आपल्या हक्कासाठी आवाज उठवणार”—अशी भावना अनेकांमध्ये उमटली आहे.

निवडणुकीचा परिणाम काहीही असो, पण रुपेश धोटेची लढत ही राजकारणातील प्रतिष्ठा आणि पैशाच्या ताकदीसमोर उभी राहिलेली एक आशावादी, हिम्मत देणारी कहाणी ठरली आहे. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना आता शहर चालवण्याची जबाबदारी मिळेल का, हे जनता ठरवेल. 27 वर्षीय रुपेश धोटेचा हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द आणि तळागाळातील लोकांप्रती असलेल्या निस्सीम आपुलकीची कहाणी. सफाई कामगार ते नगरसेवक पदाचा उमेदवार असा त्याचा मार्ग म्हणजे एक साधा युवक उभा राहत लोकशाहीला नवा आशेचा श्वास देत आहे. आता मतदार ठरवणार आहेत —घंटागाडीचा हा चालक विकासाच्या सीटवर बसणार का?