भंडाऱ्यातील वाळू तस्करीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार – बावनकुळे

36

मुंबई दि १७- भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून कठोर पाऊल उचलले जात असून यामध्ये सहभागी अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दोषी अधिकाऱ्यांचे सीडीआर काढून सात दिवसांत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा खोऱ्यात होणाऱ्या वाळू तस्करीबद्दल आ. नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

बावनकुळे म्हणाले, स्थानिक आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या कारवाईत पोलिसांची मदत घेतली जात आहे. जेवढे अधिकार महसूल विभागाला आहेत तेवढे अधिकारी पोलिसांना देण्याबाबत नवीन वाळू धोरणात विचार करत आहोत. अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. याकामी गृह विभागाची मदत घेतली जात आहे.

अपघातग्रस्त कुटुंबाला अधिकाधिक मदत

अवैध वाळू तस्करी करणाऱ्यावर कारवाई करत शासनाने २५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान डंपर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना १५ लाखांपर्यंत मदत केली जाईल. तसेच वीर महावाडे या हात गमावावा लागलेल्या तरुणाला विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडून मदत करू असेही बावनकुळे म्हणाले.